

माळेगाव ग्रामपंचायत पेठ चा 1857 च्या उठावाचा आद्यक्रांतीकारी देवाजी राऊत
पेठ चा 1857 च्या उठावाचा आद्यक्रांतीकारी देवाजी राऊत 1857 च्या उठावाचा आद्यक्रांतीकारी देवाजी राऊत १२ नोव्हेंबर ,आद्य क्रांतिवीर - देवाजी राऊत स्मृतीदिना निम्मित विनम्र अभिवादन .....1869 पूर्वी पेठ हें संस्थान होते आणि भाऊराजा हे या संस्थांनावर राज्य कारभार करत होते. या संस्थानातील माळेगाव येथे देवाजी रामजी राऊत हे पाटीलकीचे काम करत होते. ते पाहुचीबारी येथील जहागीरदार होते. इंग्रजी सतेमुळे देवाजी राऊत प्रमाणे सर्व पाटील मंडळी त्रस्त झाली होती.
इंग्रजी राजवटीत देशात एका बाजूला मोठ्या प्रमाणात विकासाचे वारे वाहत होते तर दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या मालकीचे जल ,जंगल , जमीन त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांच्या लुटीची व्यवस्था उभी राहत होती . आदिवासींचा ज्या जंगलांवर पिढीजात हक्क होता .तो काढून घेऊन जंगल रक्षणाच्या नावाखाली कायदे केले जात होते आणि कायद्याच्या नावाखाली जंगलांतील गौण वनौपजांचा व्यापार करून इंग्रजी राजवट त्याच पैशाचा वापर भारतीय व्यवस्थेला खाली ओढून आपली सत्ता प्रस्थापित करायला वापरत होती . भारतावर इतकी परकीय आक्रमणे होऊन देखील भारतातला आदिवासी कधी गुलाम झाला नाही. त्याच आदिवासींच्या वाट्याला गोऱ्या लोकांकडून लुटीची- लुबाडनुकीची परंपरा सुरु झाली . देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले . सर्वत्र इंग्रजी सत्तेच्या विरोधात असंतोष खदखदू लागला , ठिकठीकाणी आंदोलने वाढू लागली ,मोर्चे निघू लागले , स्वातंत्र्याची चळवळ वाढू लागली . माझं जल, माझं जंगल ,माझी जमीन अशा भावनेत स्वतंत्र जगणारा आदिवासी स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वतंत्र व स्वाभिमानाने उतरला ...लढला...आणि देशासाठी फासावर जाऊन , काळ्या पाण्याच्या शिक्षेला जाऊन जिंकला . ज्या इंग्रजी सत्तेने आपल्या व्यापारासाठी भारतातली जंगल ,जमीन ताब्यात घेतली .ज्यावर त्यांचा व्यापार मोठा वाढला त्यांच भागाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासींनी केलेला लढा हा खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा म्हणावा लागेल .
याच इंग्रजी राजवटीत नाशिक जवळील पेठ संस्थानात मोठ्या प्रमाणात आदिवासी एकवटला , जल ,जंगल ,जमीन वाचवण्याच्या विरोधात बंड करून उठला याच उठावाचे नेतृत्व केले ते “ देवाजी राऊत ” या माळेगावच्या भूमीपुत्राने . आदिवासी या देशाचा मूळ मालक मूळ निवासी .या देशात आदिवासींचे स्वतंत्र राज्य होते आदिवासी जमाती म्हणजे स्वतंत्र्य प्रिय व स्वात्रांत्र्यप्रेमी व स्वाभिमानी आणि कुणाच्याही दबावाला बळी न पडणारी. कुणाचीही गुलामी करणे आदिवसींच्या रक्तात नव्हते अन याच आदिवासी जमातीमधील देवाजी राऊत हा क्रांतिकारी होय . पेठ परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत कोकणी,भिल्ल,महादेव कोळी अशा जमातींचे वास्तव्य . देवाजी राऊत हा कोकणा आदिवासी जमातीचा .पेठ पासून ७/८ मैल दूर असलेल्या पहाडी डोंगरी भागातील माळेगावचा. राऊत घराण्याला इंग्रजी राजवटीत पाटीलकी दिलेली होती म्हणून पाटील घराणे हे सुखी संपन्न होते . पेठ परिसरातील आदिवासींचे जंगलांवरील हक्क अधिकार इंग्रजांनी काढून तर घेतलेच मात्र भयंकर अन्याय अत्याच्यार सुरु केला . देवाजी राऊत हे सारं दृश्य पाहत होता . आदिवासींवरील अन्याय देवाजीला सहन नं झाल्याने तो पेटून उठला . इंग्रजी सत्ता उलथून पाडण्याची जणु शपथ घेऊन देवाजीने इंग्रजांना विरोध केला . जंगलामधील महादेव कोळी ,कोकणा, भिल्ल, वारली या जमातींच्या सैन्यांना एकत्र करून गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केली त्यात त्यांना सहकार्य केले ते पेठ चे संस्थानिक भगवंतराव राजे ( दळवी ) ,अमृता पाटील , पांडू पवार , भगवानराव त्र्यंबकराव पवार व सारस्ते येथील भाऊ माळेकर यांनी. कंरजाळी, जुनोटी , डांग , कुम्भाळे, बाऱ्हे, हरसूल , कोहोर येथील क्रांतीकारकानी . देवाजी राऊत या लढ्याचा प्रमुख राहिला त्यावेळेस लढ्याचा गव्हर्नर एलफंस ,कर्नल जम्स अल अटम , कॅप्टन नुताल , कॅप्टन ग्लासपूल या इंग्रजी अधिकारांच्या विरोधात लढा उभारून त्यांना सालो कि पळो करून सोडले .
सहा वर्ष या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या देवाजीला अन त्याच्या सोबतीला असलेल्या त्याच्या फरदीन खान , धोंडू काळू , नाठ्या बोवाजी , गटु पाटील , रूप पाटील, गोविंद विठू, भिवा लखमा ,शित्रा चंदू , संतू चंदू , अर्जुन मावंजी , लखमा धोंड्या , भावू देवाजी , पांड्या देवाजी , रावजी हरया सहकाऱ्यांना इंग्रजांनी १८५७ ला पेठ येथील मामलेदार कचेरी समोर तसेच पेठ मधील ठिकठिकाणी सर्वांच्या समक्ष फासावर लटकावले .
पेठच्या उठावातक्रांतिकारकांनी भाऊराज्याचा खजिना न लुटता इग्रजांचाच खजिना लुटला. पाटीलमंडळींच्या पाठींब्याशिवाय हे शक्य नाही असा संशय गोऱ्या साहेबाना आला . त्यांनी पाटील लोकांची धरपकड करून सर्वांसमक्ष फाशी देण्याचे काम सुरु केल इंग्रज अधिकारी पोलिसांची मोठी तुकडी घेऊन माळेगावला आले. इंग्रज साहेबाने बोलाविले आहे म्हणून देवाजी राऊत भेटायला गेले. क्षणाचाही विलंब न करता इंग्रजांनी त्यांना अटक केली. त्याच्या घरातील गुरेढोरे व सर्व धान्य जप्त करण्यात आले. देवाजी पाटलांच्या घराची सर्व माणसे व आसपासचे सर्व लोक घाबरून गेले. देवाजी पाटलाला दुसऱ्या दिवशी फाशी देण्याचे ठरले. घरातील मुलेबाळे रडू लागली तेव्हां देवाजीने त्यांना धीर दिला आणि सांगितले की धान्य गेले तरी घर आहे .घराच्या माळ्यावर टोकराच्या नळकाड्यात पैसे आहेत त्याच्या आधाराने जगा . देवाजी पाटलांचे हे म्हणणे गोऱ्या साहेबाना कळले म्हणून त्याचे घरही जप्त केले. घराची झडती घेऊन टोकराच्या नळकाङयात असलेले चांदीचे तीन हजार रुपये जप्त केले. दुसऱ्या दिवशी देवाजी पाटलांना जोगमोडीजवळ फासावर चढविले. मात्र फाशीचा दोर तुटला व देवाजी राऊत तेथून जंगलाच्या दिशेने पळाले. इंग्रजांनी त्याला पकडले तेथेच जंगलात फासावर चढूऊन ठार मारण्यात आले. ज्या जोगमोडी व ननाशी दरम्यान त्यांना फाशी दिली ते ठिकाण "राऊत मारा फाटा" म्हणून अद्यापही अजरामर आहे.ज्या झाडावर फाशी दिले त्या झाडाला लागून एक दगड ठेवला आहे ,त्यांचे स्मारक म्हणून.
देवाजी राऊत, १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात जोगमोडीजवळ"राऊत मारा फाटा " येथे शहीद झालेला आदिवासी पुत्र! भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान योद्धा ...पेठचा उठाव हा 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्रातील पहिला लढा मानला जातो.

संपर्क 9689103437
